पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी

पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी
पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी

पनवेल, दि. २८ ऑक्टोबर : पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी महापालिका मुख्यालयात सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील विविध विकासकामे, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, उद्यानांचा विकास, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कीटकनाशकांचा पुरवठा आणि वाहनांची भाडेतत्त्वावर उपलब्धता यांसह विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र, जाहिरात फलक निष्कासित करण्यासाठी निधी वर्ग करण्याच्या प्रस्तावाला समितीने नकार दिला.

प्रभाग समिती ड अंतर्गत महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीकरिता सुधारित प्रशासकीय खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग समिती अ अंतर्गत नावडे गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पूर्वनिर्मित पावसाळी गटार बांधण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.

नवीन पनवेलमधील सेक्टर ४, सेक्टर १५ ए, सेक्टर ३ आणि सेक्टर ५ येथील विविध भूखंडांवर उद्याने विकसित करण्यासाठी वाढीव अथवा बचत झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. याशिवाय महापालिकेच्या कामकाजासाठी आवश्यक हार्डवेअर साहित्याचे दर दोन वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली.

महापालिकेच्या विविध सभा आणि कार्यक्रमांसाठी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण तसेच थेट व्हिडिओ प्रसारण करण्याकरिता वाढीव प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात आली. कीटकनाशके आणि रासायनिक जंतुनाशकांच्या पुरवठ्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या संगणक विभागासाठी तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्तीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील भटक्या श्वान आणि मांजरांचे निर्बीजीकरण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स इंडिया या संस्थेच्या कार्यादेशाला मुदतवाढ देण्यास समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या विविध कामांसाठी डंपर, टिप्पर, हायड्रा, क्रेन, पोकलेन, टोइंग व्हॅन, फोर्कलिफ्ट, ट्रॅक्टर, ट्रेलर आणि बॅकहो लोडर यांसारखी वाहने चालक व ऑपरेटरसह तीन वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या ई निविदेतील स्वयंभू ट्रान्सपोर्ट या किमान निविदाधारकाच्या वाटाघाटीनंतर निश्चित झालेल्या दरांना मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगत पनवेल महापालिका हद्दीतील जाहिरात फलक हटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिबिर कार्यालयास ४४ लाख ५० हजार रुपयांचा निधी वर्ग करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नामंजुरी दिली.

या सभेला स्थायी समितीचे सदस्य, सचिव नानासाहेब कामठे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, रवीकिरण घोडके, स्वरूप खारगे आणि अभिषेक पराडकर, उपसचिव अक्षय कदम तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.