राज्यातील दोन हजार ९१४ शाळांमध्ये हरित ऊर्जा आणि वीज बचतीचा जागर
ठाणे, दि. २६ ऑक्टोबर
विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांनी राज्यव्यापी प्रबोधन अभियान राबविले. या अभियानांतर्गत राज्यातील दोन हजार ९१४ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे सहा लाख १९ हजार विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
अभियंता दिन आणि गणेशोत्सवाचे औचित्य साधून १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. चित्रमय सादरीकरण, माहितीपत्रके, पोस्टर्स आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे नियम, विजेची निर्मिती आणि प्रवास, ऊर्जेची बचत तसेच हरित ऊर्जेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विकसित भारत २०४७ हे ध्येय साध्य करण्यासाठी हरित ऊर्जेची भूमिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावरही विशेष भर देण्यात आला.
अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
पुणे येथील द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड या संस्थेत अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. आवाज, स्पर्श आणि गंधाच्या माध्यमातून संभाव्य विद्युत अपघातांचे धोके कसे ओळखावेत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्युत सुरक्षेची माहिती विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.
कोकण विभागातील सर्वाधिक शाळांचा सहभाग
या अभियानात कोकण प्रादेशिक विभागातील ९४६ शाळांमधील दोन लाख १४ हजार विद्यार्थी सहभागी झाले. नागपूर विभागातील ८९९ शाळांमधील एक लाख ७१ हजार, पुणे विभागातील ८२७ शाळांमधील एक लाख ६९ हजार, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील २४२ शाळांमधील ६५ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली, संचालक मानव संसाधन राजेंद्र पवार आणि कार्यकारी संचालक परेश भागवत यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. राजेंद्र पवार यांनी जळगाव येथेही विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
महावितरणच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करून संभाव्य अपघात रोखण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याची माहिती महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली.