भटक्या-विमुक्तांची तरुणाई रंगली माता भवानीच्या भक्तीत

भटक्या-विमुक्तांची तरुणाई रंगली माता भवानीच्या भक्तीत

विशेष प्रतिनिधी : सौ. रूपाली मनोज बैसाने

मुंबई : कांदिवली पूर्व, हनुमान नगर परिसरातील तुळजाभवानी चाळीत दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजाभवानी मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. तुळजापूर येथील मिरवणुकीच्या धर्तीवर काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात भटक्या-विमुक्त समाजासह विविध जाती-धर्मांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

हलगी, संबळ, तुणतुणे, टाळ आणि झांजांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. परडी, दिवट्या आणि पोत घेऊन आराधी तसेच भाविक सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात अनेक भाविक तल्लीन झाले होते. विशेष म्हणजे यंदा मागील वर्षांच्या तुलनेत तरुण-तरुणींचा, विशेषतः ‘झेन झी’ पिढीचा मोठा सहभाग या पालखी सोहळ्यात दिसून आला.

विमुक्त भटके जनजाती विकास परिषद, अखिल भारतीय संघटनेच्या युवती प्रमुख कुमारी नम्रता अलकुंटे यांनी अनेक तरुण-तरुणींना एकत्रित करून त्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले. तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पालखी सोहळ्याला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

तुळजाभवानी मातेची पालखी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत नेण्यात आली. वीर तानाजी नगर येथील दुर्गामाता मंदिराला वळसा घालून पालखी पुन्हा आपल्या मूळ स्थानी आणण्यात आली. सुमारे चार तास चाललेल्या या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

कांदिवली पूर्व येथील तुळजाभवानी मातेची स्थापना सन १९८२ मध्ये तत्कालीन शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना नेते तथा माजी मंत्री माननीय रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या मंदिराच्या निर्मितीसाठी त्यावेळी माननीय रामदासभाई कदम यांच्याकडे साकडे घातल्याची आठवण गिरीधर साळुंके यांनी सांगितली.

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी विमुक्त भटके जाती-जमाती विकास परिषद, अखिल भारतीय संघटनेचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उबाळे, मधुकर गरडकर, विनोद वाडेकर, हरिबा कोंडे, राजू वाडेकर, किरण साळुंके, जितू माने, सूरज साळुंके, विकी अलकुंटे, रवी वाडेकर आदींनी विशेष प्रयत्न केले.

या प्रसंगाचे छायाचित्रण : चंद्रकांत उबाळे

गिरीधर साळुंके

कार्यवाह, महाराष्ट्र प्रदेश

विमुक्त भटके जनजाती विकास परिषद, अखिल भारतीय

मो. ९३२४६५९२७५.