पुणे ॲडव्होकेट प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 चे भव्य उद्घाटन 172 वकिलांमधून 104 खेळाडूंची लिलावातून निवड
पुणे | प्रतिनिधी :
पुणे ॲडव्होकेट प्रीमियर लीग 2026 या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व खेळाडू लिलाव सोहळा शनिवार पेठेतील विष्णुकृपा हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्री. सुमंत कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या उदघाटन प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम भुजबळ, फॅमिली कोर्ट अध्यक्ष ॲड कल्पना निकम मा.श्री. अनुराग कवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ॲड. गणेश कवडे, ॲड. हेमंत भांड पाटील आणि ॲड. विकास कांबळे यांनी केले. उपस्थित मान्यवर व वकील बांधवांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे लॉयर्स कंझ्युमर को-ऑप सोसायटीचे चेअरमन तसेच भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. पांडुरंग ढोरे पाटील आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. कैलास पठारे-पाटील यांचा ॲड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
क्रिकेट हा केवळ खेळ नसून संघभावना, शिस्त, नेतृत्व आणि एकतेचे प्रतीक आहे. न्यायालयीन कामकाजात व्यस्त असलेल्या वकिलांना विरंगुळा, आरोग्यवर्धन आणि आपसी स्नेह वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. PAPL 2026 च्या माध्यमातून वकिलांमध्ये खेळाडूवृत्ती, समन्वय आणि मैत्रीपूर्ण स्पर्धा वाढीस लागणार असून बार आणि बेंचमधील एकात्मता अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
“Play with Spirit, Win with Unity” हा संदेश देणारी ही लीग केवळ स्पर्धा नसून सामाजिक ऐक्य, सकारात्मक ऊर्जा आणि व्यावसायिक सौहार्द यांचे प्रतीक ठरणार आहे.
या लिलाव प्रक्रियेत एकूण 8 संघमालक सहभागी झाले होते. 172 वकिलांनी नोंदणी केली असून त्यापैकी 104 खेळाडूंना लिलावातून संघात स्थान मिळाले. प्रत्येक संघात पुणे जिल्ह्याबाहेरील 2 खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
संघ व संघमालक पुढीलप्रमाणे :
ॲड. रवींद्र शिंदे – सिंहगड सुप्रीमो
ॲड. सचिन झालटेपाटील – छावा टायटन्स
ॲड. अतिक सय्यद – शिवनेरी वॉरियर्स
ॲड. प्रणय लांझिले – तोरणा टायगर्स
ॲड. महेश कुशवाह – राजगड मावळाज
ॲड. अनिल तांबे – लोहगड फायटर्स
ॲड. पावन कुलकर्णी – जिजाई योद्धाज
ॲड. समीर तांबोळी – सिंडीकेट इलेवन
ही स्पर्धा 1 मे ते 4 मे दरम्यान शिंदे हायस्कूल मैदानावर डे-नाईट स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक व पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
या भव्य उद्घाटन व लिलाव सोहळ्यामुळे PAPL 2026 बद्दल वकील वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.