डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉल्बीवर पोलिसांची कारवाई; सोलापुरात 20.70 लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत परवानगीशिवाय डॉल्बीवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत २० लाख ७० हजार रुपये किमतीचे डॉल्बी साहित्य आणि वाहन जप्त करत प्रकरणात कपिल सुरवसे, आकाश वामणे, साजन गायकवाड, आदित्य सोनकांबळे, बाबू घागरे, अविनाश गायकवाड तसेच डॉल्बी मालक प्रेम संजय पवार (पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
शहरात १९ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नये तसेच कर्कश आवाजात गाणी वाजवू नयेत, अशा स्पष्ट सूचना सर्व मंडळांचे पदाधिकारी व साउंड सिस्टीम चालकांना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांनी १५ एप्रिल रोजी याबाबत मनाई आदेशही जारी केले होते.
तरीदेखील १९ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पार्क चौकदरम्यान वाहनांची रांग लावण्यात आलेल्या ठिकाणी सरस्वती चौकातील आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था या मंडळाकडून परवानगी नसताना मोठ्या आवाजात हिंदी व मराठी गाणी वाजविण्यात आली. पोलिसांनी तत्काळ सूचना देऊनही संबंधितांनी आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले.
यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार बेस, चार टॉप, एक मिक्सर, दोन अॅम्प्लिफायर, एक पॉवर ट्रॉली आणि अशोक लेलँड दोस्त वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.