पनवेलमध्ये ९ नोव्हेंबरला रंगणार दिवाळी पहाटचा सुरेल सोहळा
पनवेल, दि. २ : दिवाळीच्या मंगलमय पर्वात सांस्कृतिक परंपरेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रायोजकत्वाखाली दिवाळी पहाट २०२६ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे यंदा नववे वर्ष असून, सोमवार ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता वडाळे तलाव येथे हा सुरेल सोहळा रंगणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी आपल्या खास काव्यरचना सादर करणार आहेत. तसेच लोकप्रिय गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर गीतांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. काव्य आणि संगीताचा अनोखा संगम हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सोमवार २ नोव्हेंबरपासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवेशिकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
प्रवेशिका अमोल स्टेशनरी, टिळक रोड, पनवेल, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील वॉचमन टेबल, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ड कार्यालय तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कार्यालय, मार्केट यार्ड येथे उपलब्ध आहेत.
पनवेलकर रसिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून काव्य आणि संगीताच्या सुरेल पहाटेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.