गणेशोत्सव राज्य महोत्सव झाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रतिसाद
ठाणे, दि. १८ (जिमाका) : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘लोककलेतील श्री गणेश’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात २० कलाकारांच्या संचाने नमन, गण, गोंधळी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागर गोंधळ अशा विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण केले. कलाकारांच्या रंगतदार सादरीकरणामुळे प्रेक्षागृहात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांच्या शेलारमामा फाउंडेशनच्या समन्वयातून हा कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा नियोजन अधिकारी तथा ‘bappa.org’ मोहिमेचे नोडल अधिकारी वैभव कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
‘bappa.org’मुळे परवानगी प्रक्रिया सुलभ
कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या ‘bappa.org’ या डिजिटल मोहिमेचीही नागरिकांना माहिती देण्यात आली. गणेशोत्सव मंडळांची नोंदणी, विविध शासकीय परवानग्या आणि गणेशोत्सवाशी संबंधित आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून नागरिकांना आणि गणेशोत्सव मंडळांना शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करता येतात.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती, पारंपरिक गणेशोत्सव आणि डिजिटल प्रशासकीय सुविधांची माहिती एकाच व्यासपीठावर आणणारा हा कार्यक्रम ठाणेकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरला.