औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी एमपीएससी अध्यक्षांचे स्पष्टीकरण

औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी एमपीएससी अध्यक्षांचे स्पष्टीकरण
औषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी एमपीएससी अध्यक्षांचे स्पष्टीकरण

मुंबई दि. २

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीची घटना घडली त्या कालावधीत आपण आयोगाच्या अध्यक्षपदावर नव्हतो, असे भीमनवार यांनी स्पष्ट केले.

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६ मध्ये घडल्याचे समोर आले आहे. विवेक भीमनवार यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली असून ३ मार्च रोजी त्यांनी प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेशी आपला थेट संबंध जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याबाबत ही समिती उपाययोजना सुचवणार आहे.

परीक्षा आणि भरती प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी राज्य शासनानेही स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्यावर आपला भर असल्याचे भीमनवार यांनी सांगितले.

आयोगाकडे वाढीव भरती प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यानुसार परीक्षा व्यवस्थेत विविध सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी सार्वजनिक भरती प्रक्रिया जोडलेली असल्याने ती अधिक निष्पक्ष आणि सुरक्षित करण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना सार्वजनिक परीक्षांच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. मात्र कोणत्याही गंभीर आरोपांची सत्यता अधिकृत नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासली जाणे आवश्यक आहे, असे भीमनवार यांनी स्पष्ट केले.

आयोगाची निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे तसेच प्रत्येक उमेदवाराला समान आणि न्याय्य संधी देणे ही आपली घटनात्मक जबाबदारी असून ती पूर्ण पारदर्शकता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा प्रक्रियेसारख्या संवेदनशील विषयाचे रूपांतर वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादात होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.