सीपीआर प्रशिक्षणाचा उपक्रम सोसायट्यांपर्यंत पोहोचवा

सीपीआर प्रशिक्षणाचा उपक्रम सोसायट्यांपर्यंत पोहोचवा

पनवेल, दि. ६ : हृदयविकाराचा झटका किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत सीपीआर (CPR) दिल्यास त्याचे प्राण वाचविणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सीपीआर देण्याचे योग्य तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे अभियान अधिक व्यापक करून मॉल्स, सार्वजनिक संस्था आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही सीपीआर प्रशिक्षण देण्यात यावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे ६ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.

कार्यक्रमाला अमेरिकन हार्ट असोसिएशनचे भारतीय उपखंडाचे सल्लागार आणि एमजीएम नेरूळ येथील भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ साठे, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रितम म्हात्रे, चारही प्रभाग समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महापौर नितीन पाटील यांनी सांगितले की, सध्या कमी वयातही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत सीपीआर प्रशिक्षण प्रत्येकासाठी उपयुक्त ठरू शकते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत हा उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

एशियन हार्ट संस्थेचे डॉ. अशोक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना सीपीआरचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, नगरसेवक तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागी व्यक्तींना बेसिक लाईफ सपोर्टचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

आमदार आणि महापौर यांनी स्वतः प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतल्याने या अभियानाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

खारघर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा सन्मान

कायाकल्प प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खारघर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५ ला राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरोग्य केंद्राला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

सात नागरिकांना वैद्यकीय आर्थिक मदत

महापौर सहायता निधीतून सात नागरिकांना कर्करोग आणि क्षयरोगाच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मदतीचे वितरण करण्यात आले.