दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लावणी कलाकारांचे एक लाखांचे योगदान
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपक्रमाला सांस्कृतिक क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत लावणी कलाकारांनी एक लाख रुपयांचा निधी जमा केला असून, त्याचा धनादेश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी हा धनादेश मंत्र्यांकडे दिला.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या आवाहनानुसार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची नाट्यगृहे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून कलाकार आणि विविध सांस्कृतिक संस्था कार्यक्रमांचे आयोजन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक योगदान देत आहेत.
लावणी, संगीत, नृत्य, नाटक आणि हिंदी चित्रपटगीतांवर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी संकलन केले जात आहे. कलाकारांच्या कलागुणांना सामाजिक कार्याची जोड देत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अकादमीने उपलब्ध तारखांनुसार नाट्यगृहे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत २६ ऑक्टोबर रोजी लावणी कलावंत महासंघाच्या वतीने लावण्यसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कविता घडशी, आकांक्षा कदम, विद्या सदाफुले, गौरी जाधव, मोना गावडे, वर्षा दर्पे आणि हर्षला राऊत यांच्यासह विविध कलाकारांनी सहभाग घेतला.
१२ नोव्हेंबर रोजी संस्कृती फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गीतांवर आधारित नृत्यसादरीकरण होणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी आता थांबवायचं कसं या नाटकाचा प्रयोग होणार असून, त्यात सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे आणि डॉ. गिरीश ओक सहभागी होणार आहेत.
याशिवाय ६ डिसेंबर रोजी राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम, ९ जानेवारी २०२७ रोजी अर्चना अनिरुद्ध यांचा शाम ए अदा हा बॉलिवूड गीतांवर आधारित कार्यक्रम आणि १२ जानेवारी रोजी संजीवनी भेलांडे यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. पुण्यातील भरत नाट्यसंशोधन मंदिराच्या वतीने फेब्रुवारीमध्ये तीन दिवसीय संगीत नाटक महोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या संस्थांना अकादमीच्या उपलब्धतेनुसार नाट्यगृह, तालीम दालन तसेच प्रकाश आणि ध्वनिव्यवस्थेच्या सुविधा विनामूल्य दिल्या जाणार आहेत. कार्यक्रमातून जमा होणारी निर्धारित रक्कम संबंधित संस्थांना धनादेशाद्वारे अकादमी प्रशासनाकडे सुपूर्द करावी लागणार आहे.
कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी व्हावे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.