इचलकरंजीत रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजीत रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजीत रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजीत रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी, दि. १९ ऑक्टोबर : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन, सेप्ट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शहरातील सुमारे ६० स्पर्धकांनी सहभाग घेत रांगोळ्यांच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला.

महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, जलस्रोतांचे संरक्षण आणि पाण्याचा अपव्यय टाळणे यांसारख्या विषयांवर स्पर्धकांनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या.

विविध वयोगटांतील महिला आणि पुरुषांनी स्पर्धेत सहभाग घेतला. रंगसंगती, कलात्मकता आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे या स्पर्धेला कलात्मकतेसोबतच पर्यावरणविषयक जनजागृतीचे स्वरूप प्राप्त झाले.

महानगरपालिकेच्या शाळांमधील चित्रकला शिक्षकांच्या तीन सदस्यीय समितीने रांगोळ्यांचे परीक्षण केले. कलात्मकता, विषयाची मांडणी, रंगसंगती आणि जलसंवर्धनाचा संदेश या निकषांवर उत्कृष्ट तीन रांगोळ्यांची विजेत्या म्हणून निवड करण्यात आली. विजेत्यांना महानगरपालिकेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच एका विशेष उल्लेखनीय रांगोळीसाठी माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी उमेश कांबळे यांच्या वतीने ५०० रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.

या उपक्रमावेळी सीडब्ल्यूएएसचे प्रतिनिधी भूषण टवलारे, महानगरपालिकेचे शिक्षक विकास थोरात आणि अनिल रावळ, शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके तसेच प्रतीरंग स्टुडिओचे सारंग भांबुरे उपस्थित होते.

सण आणि उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पाणी बचत आणि जलस्रोतांचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.