लोककलेतील श्रीगणेश टपाल तिकिटाचा वापर करण्याचे आवाहन

लोककलेतील श्रीगणेश टपाल तिकिटाचा वापर करण्याचे आवाहन
लोककलेतील श्रीगणेश टपाल तिकिटाचा वापर करण्याचे आवाहन
लोककलेतील श्रीगणेश टपाल तिकिटाचा वापर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित विशेष कार्यक्रमात ॲड. शेलार यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्यासह गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे शेलार यांनी सांगितले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सवात लोकसहभाग, कल्पकता, नावीन्य, कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा संगम दिसतो. महाराष्ट्रातील या उत्सवाचे वैश्विक सांस्कृतिक महत्त्व जगासमोर मांडण्यासाठी व्यापक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले.

राज्य महोत्सवांतर्गत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रवींद्र नाट्य मंदिरात तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून ओडिशा, अंदमान निकोबार आणि दुबई येथेही राज्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत वर्षभरात राज्यभर एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याचे जतन व संवर्धन करणे आणि जागतिक स्तरावर त्याला स्थान मिळवून देणे हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सांस्कृतिक वारशाचे टपाल तिकिटातून जतन

महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासाचा आढावा घेतला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती तसेच स्वातंत्र्यलढ्यातही या उत्सवाचे योगदान राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

‘लोककलेतील श्रीगणेश’ संकल्पनेवरील ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे फिलाटेलिक स्मृतिचिन्ह ठरेल. या उपक्रमामुळे नव्या पिढीत टपाल तिकिटे आणि फिलाटेलीविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, असे जायभाये यांनी सांगितले.

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी सांगितले.