पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात
पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात
पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात
पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

पुणे, दि. २४ : राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा, स्वच्छता मोहीम, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, विसर्जन घाट स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मावळ तालुक्यातील इंदोरी येथे १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. अभियानात गावातील विविध घटकांचा सहभाग वाढविण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

विशेष ग्रामसभेला ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अभियानातील उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

स्वच्छतेवर प्रशासनाचा भर

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणे, गाव परिसर तसेच धार्मिक आणि सामाजिक स्थळांची स्वच्छता करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गणपती विसर्जन घाटाची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी विसर्जनस्थळी स्वच्छता राखावी तसेच निर्माल्य आणि इतर साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, याबाबत सूचना देण्यात आल्या.

बेलसर माळशिरस परिसरात ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. गराडे तसेच इतर गावांमध्येही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विठ्ठल माध्यमिक विद्यालय, मानाप्पावस्ती येथे जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले.

लोकसहभागातून अभियानाला गती

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विविध शासकीय उपक्रमांची माहिती पोहोचविण्यासोबतच स्वच्छता, जनजागृती आणि लोकसहभागाला चालना दिली जात आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, अधिकारी कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

स्थानिक गरजेनुसार ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे नियोजन करून नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.