पुणे विभागीय निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना सूचना समन्वय अधिकाऱ्यांनी संघभावनेने काम करावे

पुणे विभागीय निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना सूचना समन्वय अधिकाऱ्यांनी संघभावनेने काम करावे
पुणे विभागीय निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना सूचना समन्वय अधिकाऱ्यांनी संघभावनेने काम करावे

पुणे, दि. २४ : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, नियुक्त करण्यात आलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समन्वयाने आणि संघभावनेने पार पाडाव्यात, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे, नोडल अधिकारी तसेच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

तेली उगले यांनी सांगितले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदविला जातो. या प्रक्रियेतील फरक वगळता आचारसंहिता आणि इतर निवडणूकविषयक तरतुदी सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच लागू असतात. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक नियमांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी.

निवडणुकीच्या विविध जबाबदाऱ्यांसाठी आवश्यक नियोजन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मतमोजणीची प्रक्रिया अधिक काळ चालण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या कालावधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत तुषार ठोंबरे यांनी विविध कक्ष आणि पथकांच्या जबाबदाऱ्यांचे सादरीकरण केले. मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे, खर्च नियंत्रण, मतदानपूर्व तयारी, वाहतूक व्यवस्था, अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण, उमेदवार प्रतिनिधींचे प्रशिक्षण, वेबकास्टिंग, संगणकीकरण, माध्यम कक्ष, पेड न्यूज, पोलीस मनुष्यबळ, कायदा व सुव्यवस्था, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, प्रचार साहित्य, जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण, मतदान केंद्रांवरील सुविधा तसेच मतमोजणीची तयारी याबाबत माहिती देण्यात आली.