ठाण्यात आणखी एक सीबीएसई शाळा
ठाणे, दि. 24 सप्टेंबर 2026 : ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने कावेसर येथे नवीन सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे गरजू आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.
खारीगांव येथे सुरू असलेल्या सीबीएसई शाळेच्या धर्तीवर कावेसर येथे ही नवीन शाळा उभारण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त मेजर डॉ. नितीन राठोड, उपायुक्त डॉ. मिताली संचेती तसेच क्रिस्टल हाऊस इंडियाच्या आंतरराष्ट्रीय संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अध्यक्षा मार्था लॅमकिन, अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड हॅरिस, उपाध्यक्ष डोनाल्ड नेबेल, मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन सी. मॅथ्यू आणि माजी जागतिक क्रमांक एक टेनिसपटू राजीव राम यांचा समावेश होता.
करारानंतर उपस्थितांनी खारीगांव येथील शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अनुभवांची माहिती जाणून घेतली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात किमान एक आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक शाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात मुंब्रा आणि दिवा भागातून करण्यात येणार असून, या परिसरातही लवकरच नवीन शाळा उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाला राज्य सरकारचा पाठिंबा असून, आवश्यक शासकीय निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.