दिवा प्रभागातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
ठाणे, दि. ४ सप्टेंबर २०२६ : दिवा प्रभागातील विविध विकासकामांचा ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. रस्ते, वाहतूक, पूल, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि सुशोभीकरणाशी संबंधित कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वाय जंक्शन आणि शीळ फाटा सर्कलपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. दिवा शीळ मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, रुंदीकरण, लँडस्केपिंग, पुलाखालील परिसराचे सुशोभीकरण तसेच रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
शीळ दिवा मार्गावरील रखडलेली कामे आणि खाडी परिसरातील विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. सांडपाणी वाहिन्या, नालेसफाई, विद्युत सुविधा आणि इतर मूलभूत सुविधांची कामे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राधान्याने पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.
दिवा पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, पादचारी सुविधा, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही आयुक्तांनी पाहणी केली. रेल्वे स्थानक परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधाजनक करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दिवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या एफओबीच्या कामाला सुरुवात करण्याबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले. दिवा स्टेशनजवळील तलावाचे सर्वेक्षण करून सुशोभीकरण, पुलाशेजारील गटाराचे काम, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा आणि चौक सुशोभीकरणाची कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली.
टाटा पॉवर धर्मवीर रस्त्याचे काम सुरू करण्यासोबतच टाटा पॉवर नॅशनल स्कूल परिसरातील अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणींमुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
दिव्यातील मुख्य रस्त्यांवरील फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नियमित स्वच्छता कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक स्वच्छतागृहे, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन आणि प्रभाग समिती कार्यालय परिसरातील नागरी सुविधांचीही पाहणी करण्यात आली. दिवा शीळ मार्गावरील बंद असलेले नाल्याचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत तसेच संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या प्रक्रियेबाबतही चर्चा झाली.
दिवा प्रभागातील कोणतेही विकासकाम अनावश्यकपणे रखडू नये. तांत्रिक, प्रशासकीय किंवा अतिक्रमणाशी संबंधित अडचणी तातडीने दूर करून सर्व कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.