उन्नती गार्डनमध्ये खुल्या रंगमंचाचे भूमिपूजन
ठाणे, 25 सप्टेंबर : देवदयानगर येथील उन्नती गार्डनमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या खुल्या रंगमंचाचे भूमिपूजन राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाईनगर, वर्तकनगर आणि शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांसाठी हा रंगमंच सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र ठरणार आहे.
उन्नती गार्डन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रभाग क्रमांक 5, 7 आणि 14 मधील विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. सध्या अस्तित्वात असलेल्या रंगमंचाची उंची वाढविण्याची मागणी नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार नव्याने उभारण्यात येणारा रंगमंच 20 फूट उंचीचा असणार आहे.
या रंगमंचावर माघी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक उपक्रमांसाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
ठाणे शहरातील विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता आणि विविध परवानग्यांमुळे कामाला विलंब झाला. आता ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत रंगमंचाचे काम पूर्ण होणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
भूमिपूजन सोहळ्यास वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा जयश्री डेव्हीड, नगरसेविका परिषा सरनाईक, विमल भोईर, शितल ढमाले, नगरसेवक वैभव कदम, राकेश शिंदे, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.