पनवेल स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा 29 सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि विविध नागरी कामांशी संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी माहिती दर्शक फलक बसविण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. तसेच कळंबोली धारण तलाव येथे पंपिंग स्टेशन उभारणे आणि त्यासंदर्भातील अनुषंगिक कामांनाही मंजुरी देण्यात आली.
खारघर कोपरा, सेक्टर 15 येथील भूखंडाला संरक्षण भिंत बांधणे, विरंगुळा केंद्राच्या इमारतीवर शेड उभारणे तसेच अन्य आवश्यक कामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी विद्युत उपकरणे व विद्युत व्यवस्था भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या कामातील अंतिम देयक अदा करण्यासाठी झालेल्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. जयंती उत्सव, सण आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने इमारती, रस्ते, चौक आणि स्मारकांवर तीन वर्षांसाठी आकर्षक विद्युत रोषणाई उपलब्ध करून देण्याच्या कामासही मान्यता देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्रिकेट अकॅडमीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. खारघर नोडमधील मलनिःस्सारण वाहिन्यांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती, सुधारणा आणि नूतनीकरण करण्याच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय खर्चासही मान्यता देण्यात आली.
कामोठे सेक्टर 32 येथील 85 एमएलडी क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राचे परिचलन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सिडकोने नियुक्त केलेल्या ठेकेदारास नवीन ठेकेदाराची नियुक्ती होईपर्यंत वाढीव मुदत देण्यास मंजुरी देण्यात आली.
महापालिका क्षेत्रात यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविणे, तसेच दैनंदिन रस्तेसफाई, नालेसफाई आणि अन्य अनुषंगिक कामांसाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या कामास मुदतवाढ देण्यासही मान्यता देण्यात आली.
महापालिका हद्दीत विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली. पनवेल शहर वगळता महापालिका क्षेत्रातील 29 गावांसाठी तीन वर्षांच्या कालावधीकरिता पाणीपुरवठा योजनेची दैनंदिन देखभाल, निगा व दुरुस्ती करण्याच्या कामास तसेच पनवेल शहरातील पाणीपुरवठा योजनेची तीन वर्षांसाठी निगा व दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.
सभेला आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, सचिव नानासाहेब कामठे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखाधिकारी पूनम पाटील, शहर अभियंता राजेश कर्डिले, उपसचिव अक्षय कदम यांच्यासह स्थायी समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.