लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा रविंद्र चव्हाण
अमरावती, दि. २६ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील गुरुकुंज आश्रमातील समाधी व गादीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ‘सेवा परमो धर्मः’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वडनगर ते वाराणसी सेवा संकल्प यात्रेचे मोझरी येथे आगमन झाले. यावेळी चव्हाण यांनी शिंदोळा ते मोझरी बाईक रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी यात्रेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामोन्नती आणि जनसहभागाचा विचार मांडला. हा सेवाभाव समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजयुमोच्या वतीने यात्रा आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चव्हाण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.