विनर्स अकादमीची मिळकत आळंदी नगरपरिषदेने केली सील
आळंदी : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेकडून शहरातील कोचिंग क्लासेस आणि विविध आस्थापनांची पाहणी सुरू आहे. या पाहणीदरम्यान विनर्स अकादमीच्या इमारतीवर नगरपरिषदेकडून कारवाई करण्यात आली.
नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची पाहणी केली असता श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या जुना ११३७ आणि नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले.
नगरपरिषदेच्या अभिलेखानुसार संबंधित आस्थापनेने आवश्यक व्यवसाय परवाना किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू कायदे आणि नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील केली. या कारवाईवेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेच्या कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.