महिला बचत गट, फेरीवाल्यांसाठी आवास योजनेचा पुढाकार
इचलकरंजी : सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला बचत गटातील सदस्य तसेच पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र फेरीवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० चा लाभ मिळवून देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.
यासाठी महानगरपालिकेच्या कौन्सिल सभागृहात गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला फेरीवाला समितीचे सदस्य तसेच महिला बचत गटांच्या एरिया लेव्हल फेडरेशन आणि सिटी लेव्हल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते.
महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असून, महिला बचत गटातील महिला आणि फेरीवाल्यांमधील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित समित्या आणि सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना विभागाच्या शुभांगी जोशी यांनी योजनेचे उद्दिष्ट, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली.
NULM विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे यांनी फेरीवाला समिती, ALF आणि CLF सदस्यांनी त्यांच्या स्तरावर लाभार्थ्यांच्या बैठका घेऊन योजनेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना दिल्या.
घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या पात्र महिला बचत गट सदस्य आणि फेरीवाल्यांना योजनेची माहिती देऊन अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.