रामदास आठवले २३ नोव्हेंबरला वैजापुरात रोहित पाठारे यांच्या कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट

रामदास आठवले २३ नोव्हेंबरला वैजापुरात रोहित पाठारे यांच्या कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट

मुंबई, दि. १७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे दलित तरुण रोहित पाठारे यांची सामूहिक हल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या अमानुष घटनेचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत रामदास आठवले येत्या २३ नोव्हेंबर रोजी सकाळी वैजापूर येथे भेट देणार आहेत. यावेळी ते दिवंगत रोहित पाठारे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. याबाबतची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली.