ठाणे महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात

ठाणे महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात

ठाणे, दि. २ : ठाणे महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन गुरुवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाणेकर नागरिकांचा यावेळी ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या नागरिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून ठाणे शहराचाही असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पं. मुकुंद मराठे, पत्रकार एकनाथ बिरवटकर, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड, चंद्रशेखर महाशब्दे, देविदास चाळके, संजीव ब्रह्मे, सदाशिव टेटविलकर, प्रकाश कोटवानी, अनिरुद्ध जोशी, सदाशिव कुलकर्णी, सुभाष मालेगांवकर आणि रामचंद्र चिमाजी जंगले यांना ठाणे भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात कांस्यपदक मिळविणाऱ्या रुद्रांश बाळासाहेब पाटील याला ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, कलाकार आणि खेळाडूंचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी ठाणे महापालिका भवन येथे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त मेजर डॉ. नितीन राठोड, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते.