मानसिक आरोग्य सप्ताहातून जनजागृती
ठाणे : प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य सप्ताह विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. अनुभवलेल्या व्यथा ऐकू या, खरे आवाज, खरा बदल या २०२६ च्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार मानसिक आजारांचा सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव समाजापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर करणारे, वेळेवर उपचारांचे महत्त्व, पुनर्वसन आणि सामाजिक स्वीकार याविषयी माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
व्यवसायोपचार विभागात उपचारांनंतर मानसिक आजारातून सावरलेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. या यशस्वी पुनर्वसनाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे उपसंचालक डॉ. कैलास पवार होते. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती शिबिरे, ओपीडी सेवा आणि रॅलींचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक आणि सुलभ करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी रुग्णांकडे केवळ रुग्ण म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे मायेने आणि सन्मानाने पाहण्याची भूमिका मांडली. अशा संवेदनशील वातावरणामुळे अनेक रुग्ण उपचारानंतर आत्मविश्वासाने समाजाच्या मुख्य प्रवाहात परतत असल्याचे त्यांनी सांगितले.
दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मानसिक आरोग्य सेवेत सहानुभूती आणि संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ऐकण्यापासून कृतीकडे या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत समाजात स्वीकार आणि संवेदनशीलता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात. आला.