खारघर, रोडपाली, तळोजा, कामोठ्यात स्वच्छता मोहीम
पनवेल, दि. २ : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ या संकल्पनेनुसार खारघर, रोडपाली, तळोजा आणि कामोठे परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कामोठे आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत केएलई कॉलेज कळंबोली, लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज खारघर, एमजीएम कॉलेज कामोठे आणि सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतादूतांसोबत स्टेशन परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमाला महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
खारघर येथे रामशेठ ठाकूर सेकंडरी अँड हायर सेकंडरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांच्या सहभागातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
रोडपाली विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील सेक्टर १२ येथील हिंदू स्मशानभूमीतही श्रमदान अभियान राबविण्यात आले. उपमहापौर प्रमिला पाटील आणि प्रभाग समिती अ चे सभापती रवींद्र भगत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतादूत सहभागी झाले.
पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सातत्याने सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.