पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्मा पोलिसांना अभिवादन
गेल्या वर्षभरात देशभरात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध देशांच्या दूतावासांतील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला.
कर्तव्य बजावताना प्राण अर्पण करणाऱ्या शूर पोलिसांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन संचलन आयोजित केले जाते. १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील तसेच अर्धसैनिक दलातील शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.