पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी व्यापक मतदार जनजागृती
पुणे, दि. 29 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी विविध माध्यमांतून व्यापक मतदार जनजागृती करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह समन्वय अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित पाचही जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.
मतदारांना मतदानासाठी वापरावयाचे पेन आणि पसंतीक्रमानुसार मतदान करण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात यावी, अशा सूचना तेली उगले यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहावे, असेही त्यांनी सांगितले.
मनुष्यबळाचे योग्य नियोजन, मतदान आणि मतमोजणीसाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
निवडणुकीच्या कामकाजात आचारसंहितेच्या तरतुदींचे पालन करून मार्गदर्शक पुस्तिका तसेच भारत निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक प्रशासन आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरील सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीत नामनिर्देशन प्रक्रिया, मतदान व मतमोजणी, मतदार जनजागृती, मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे व खर्च नियंत्रण, मतदानपूर्व तयारी आणि वाहतूक आराखडा यांचा आढावा घेण्यात आला.