सेवा संकल्प अभियानाची ई बाईक रॅली उत्साहात

सेवा संकल्प अभियानाची ई बाईक रॅली उत्साहात
सेवा संकल्प अभियानाची ई बाईक रॅली उत्साहात
सेवा संकल्प अभियानाची ई बाईक रॅली उत्साहात

इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी ई बाईक व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रॅलीला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवा संकल्प अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देणे हा रॅलीचा उद्देश होता. महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीपासून स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक राजू बोंद्रे, उपायुक्त विद्या कदम आणि सहायक आयुक्त रोशनी गोडे यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली.

रॅली शिवतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक, नाट्यगृह, चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, तीन बत्ती चार रस्ता चौक आणि छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत महानगरपालिका कार्यालयात पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीदरम्यान ई बाईकसारख्या पर्यावरणपूरक वाहनांचा वापर, इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीमुळे सेवा संकल्प अभियानाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

या रॅलीमध्ये सहायक आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, नगरसचिव राहुल पोटे, क्रीडा अधिकारी संजय शेटे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.