कृषी, दुग्धव्यवसाय आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर

कृषी, दुग्धव्यवसाय आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर

मुंबई, दि. १२ : स्वीडनमधील प्रगत तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची उत्पादन क्षमता यांची सांगड घालून स्वीडिश उद्योजकांनी राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योग उभारावेत. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांतही गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

स्वीडनच्या राजदूत पेट्रा मेनांडर यांनी मुंबई भेटीदरम्यान सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि स्वीडन यांच्यातील औद्योगिक गुंतवणूक, संरक्षण उत्पादन, एरोस्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.

पुणे ते नाशिकदरम्यान स्वीडिश कंपन्यांसाठी औद्योगिक समूह विकसित करण्याच्या शक्यतेवरही यावेळी विचारविनिमय झाला. या औद्योगिक समूहासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील विविध भागांत औद्योगिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

स्वीडनमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये अधिकाधिक वापर करणे, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादन क्षमता वाढविणे तसेच उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यावर यावेळी भर देण्यात आला. आधुनिक दुग्धव्यवसाय तंत्रज्ञानाचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याबाबतही चर्चा झाली.

याशिवाय महाराष्ट्र आणि स्वीडन यांच्यातील विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण वाढविण्याच्या दृष्टीने सहकार्याच्या विविध शक्यतांवर विचार करण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करून राज्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करणे आणि दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे यावरही बैठकीत भर देण्यात आला.