नियमभंगामुळे सोलापूरमधील गृहनिर्माण संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती

नियमभंगामुळे सोलापूरमधील गृहनिर्माण संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती

सोलापूर प्रतिनिधी : शासकीय अटींचा भंग करून जमिनीचा व्यावसायिक वापर करणे, संस्थेच्या खुल्या जागेची नियमबाह्य विक्री करणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याच्या तक्रारींनंतर सोलापुरातील आदर्श सहकारी इमारत संघ या गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सोलापूर शहराचे उपनिबंधक उमेश पवार यांनी सहकार कायद्याच्या कलम ७८ अ नुसार हा आदेश दिला असून संस्थेच्या प्रशासकपदी के. बी. जमादार यांची नियुक्ती केली आहे.

सोलापुरातील रंगभवन परिसरातील आदर्श सहकारी इमारत संघ या संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांनी १९५१ मध्ये केवळ ३७ सभासदांसाठी नाममात्र दराने शासकीय जमीन दिली होती. ही जमीन फक्त निवासी प्रयोजनासाठी वापरणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिचे हस्तांतरण न करणे आणि कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापर न करणे अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, या अटींचा भंग करून संस्थेच्या संचालक मंडळाने मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतरण करून मुद्रांक शुल्क बुडविणे, जमा-खर्चाच्या नोंदी न ठेवणे, संस्थेच्या खुल्या जागेची बिगरसभासदाला नियमबाह्य विक्री करणे, कामकाजाची आवश्यक कागदपत्रे न जतन करणे आणि सभासदांच्या वारसांना सभासदत्व न देणे अशा अनेक अनियमिततेच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या कारभारामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाल्याचाही आरोप आहे.

संस्थेचे वारसदार सभासद महेश बसवेश्वर दुलंगे आणि दिलीप सिद्धे यांनी या प्रकरणी शहर उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करून संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.

चौकशी अहवालात संचालक मंडळावर ठपका

सहकार कायद्याच्या कलम ८९ अन्वये सहकार अधिकारी व्ही. टी. चवरे आणि लेखापरीक्षक शेटे यांनी तक्रारीतील मुद्द्यांची सखोल चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी अहवाल सादर करून संचालक मंडळाच्या कामकाजावर ठपका ठेवला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अजित ओक आणि सर्व संचालकांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला. संस्थेच्या वतीने ॲड. एम. डी. घोडके यांनी खुलासा सादर केला होता.

प्रशासकांकडे संस्थेची जबाबदारी

संचालक मंडळाचे कामकाज नियमबाह्य असल्याचे आणि संस्थेने दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे उपनिबंधकांच्या निदर्शनास आले. चौकशी अहवालात तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने उमेश पवार यांनी कलम ७८ अ नुसार संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी के. बी. जमादार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाली असून, संचालक मंडळावरील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांबाबत पुढे कोणती कारवाई होते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.