सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू

सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू
सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू

मुंबई, दि. २८ : कैलास मानसरोवर यात्रेनंतर भारताकडे परतत असताना तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर हे सर्व भाविक आज सकाळी सहा वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टच्या मार्गाने काठमांडूकडे रवाना झाले.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली येथील हे भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या मार्गावर प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचा सागा येथे मुक्काम वाढला होता. दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता काठमांडूहून त्यांचे परतीचे विमान असल्याने त्यांना नियोजित वेळेत काठमांडू येथे पोहोचणे आवश्यक होते.

भाविक सागा येथे अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून भाविकांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. आवश्यक मदत आणि सहकार्य मिळाल्यानंतर सर्व ३७ भाविकांनी काठमांडूच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याने भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत. भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासनाकडून आवश्यक समन्वय आणि पाठपुरावा सुरू आहे.