कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव
मुंबई, दि. २८ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबईतील कामाठीपुरा परिसराला भेट देत तेथील महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. यावेळी त्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
कामाठीपुऱ्यातील महिलांशी हितगुज करताना आठवले यांनी त्यांच्या जीवनातील अडचणी आणि सामाजिक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक महिला विविध राज्यांतून उदरनिर्वाहासाठी येथे येतात आणि कठीण परिस्थितीत जीवन जगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या माध्यमातून या महिलांशी भावनिक नाते जोडण्याची संधी मिळाल्याचे सांगत आठवले यांनी त्यांच्या हस्ते राखी बांधून घेणे हा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली.
या महिलांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जीवन जगता यावे यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्वसन, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या अडचणी दूर करून त्यांना स्वावलंबी बनविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अशा घटकांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.