बोगस डॉक्टर प्रकरणी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तीव्र भूमिका – दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आरोग्य विभागाला घेराव

बोगस डॉक्टर प्रकरणी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तीव्र भूमिका – दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आरोग्य विभागाला घेराव

मुंबई : शनिवार 6 सप्टेंबर 2025

सांताक्रूझ येथील बी.एन. देसाई रुग्णालयासह मुंबईतील इतर काही रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर नेमण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या गंभीर गैरप्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक चे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (आरोग्य विभाग) यांना ई-मेलद्वारे अधिकृत पत्र पाठवून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कायदेशीर मागणी ॲड. अमोल मातेले यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की कंत्राटदाराने रुग्णालयात बोगस डॉक्टर नेमून केवळ आर्थिक फायदा मिळवला नसून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे त्याच्यावर खालील भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे :कलम 420 : फसवणूक कलम 406 : विश्वासभंग कलम 468 : फसवणुकीसाठी कागदपत्रांची बनावट निर्मिती कलम 471 : बनावट कागदपत्रांचा वापर कलम 304A : निष्काळजीपणामुळे मृत्यू/अपाय कलम 336, 337, 338 : जीव धोक्यात घालणे व दुखापत करणे कलम 120B : गुन्हेगारी कट तसेच, या कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करून भविष्यात कोणतेही कंत्राट न देण्याची मागणी करण्यात आली आहे.

इशारा या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय इतका मोठा गैरप्रकार होणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे व त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हीच खरी जनतेच्या आरोग्याची हमी असल्याचे ॲड. मातेले यांनी स्पष्ट केले.

“मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टर प्रकरणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत मूकदर्शक राहणार नाही. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही लढा देऊ,” असे ॲड. अमोल मातेले यांनी ठामपणे सांगितले.