बीडमध्ये आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाचा नवा उपक्रम
बीड, दि. २० (जिमाका) : अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना रोजगार मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी बीड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कौशल्यवर्धन केंद्र अर्थात सी ट्रिपल आयटीच्या माध्यमातून तरुणांना आधुनिक आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, नियमित पदवी किंवा पदविका शिक्षण सुरू ठेवूनही विद्यार्थ्यांना या केंद्रातील अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत.
केंद्राच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पूर्वतयारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इघारे, टाटा टेक्नॉलॉजीजचे युवराज पाटील, श्री. आनंद यांच्यासह कौशल्य विकास विभाग, तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील अधिकारी उपस्थित होते.
चर्चासत्रात टाटा टेक्नॉलॉजीजचे युवराज पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे केंद्रातील १८ विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. सध्या बीड केंद्रात चार अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, १६० उमेदवारांसाठी दोन प्रशिक्षण बॅचची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक बॅचमध्ये २० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या केंद्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आपले नियमित महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याची गरज नाही. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम सुरू असतानाच अंशकालीन स्वरूपात आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
चर्चासत्रादरम्यान विद्यार्थी आणि पालकांनी अभ्यासक्रमांचे स्वरूप, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. सी ट्रिपल आयटी केंद्रामुळे जिल्ह्यातील तरुणांना कौशल्याधारित शिक्षणासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.