पनवेल मनपाच्या महासभेत विविध विकासकामांना मंजुरी
पनवेल : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा क्रमांक १० मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत विविध विषयांवर चर्चा करून अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली, तर काही विषय स्थगित ठेवण्यात आले.
सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे आणि उपसचिव अक्षय कदम उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ५१ शाळा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. तसेच महापालिका मालकीच्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामाला दोन वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली.
कामोठे आणि पनवेल परिसरातील महापालिका मालकीच्या मोकळ्या भूखंडांवर माहिती दर्शक फलक बसविणे आणि रोड मार्किंग करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. कळंबोली येथील लोकनेते दि. बा. पाटील मैदान, पिसार्वे व करवले गावाकडे जाणारा रस्ता तसेच धानसर गाव आणि धानसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे उभारून कार्यान्वित करण्यासही मान्यता देण्यात आली.
नवीन पनवेल सेक्टर ८ मधील भूखंड क्रमांक १२९ येथील उद्यानाच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा विभागासाठी १० हजार लिटर क्षमतेचे २० नवीन वॉटर टँकर खरेदी करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
सन २०२६-२७ मध्ये नागरी आरोग्य केंद्रे आणि नागरी वर्धिनी केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांना औषधोपचारासाठी ई-निविदा काढण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच महापालिका शाळांमधील जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी अपेक्षित खर्चास मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे निष्कासनासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि वाहने पुरविण्याच्या निविदेचा विषय स्थगित ठेवण्यात आला. पर्यावरण सद्यस्थिती अहवाल, तसेच विविध प्रभागांतील गटार व पादचारी मार्गांवरील इन्स्पेक्शन चेंबर्सवर झाकणे बसविणे आणि किरकोळ दुरुस्तीच्या काही विषयांनाही स्थगिती देण्यात आली.