१९० वधू-वरांचा सहभाग; मराठा मंडळ मुलुंडचा १७ वा भव्य परिचय मेळावा उत्साहात संपन्न

१९० वधू-वरांचा सहभाग; मराठा मंडळ मुलुंडचा १७ वा भव्य परिचय मेळावा उत्साहात संपन्न
१९० वधू-वरांचा सहभाग; मराठा मंडळ मुलुंडचा १७ वा भव्य परिचय मेळावा उत्साहात संपन्न
१९० वधू-वरांचा सहभाग; मराठा मंडळ मुलुंडचा १७ वा भव्य परिचय मेळावा उत्साहात संपन्न

मुंबई : ‘नाती जुळवूया, नव्या आयुष्याची सुरुवात करूया’ हा सामाजिक संदेश देत मराठा मंडळ, मुलुंड (मुंबई) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला १७ वा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा २०२६ रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मुलुंड पूर्व येथील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्रात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित या मेळाव्याला मराठा समाजातील विवाहेच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल १९० उमेदवारांनी सहभाग नोंदवत स्वतःचा परिचय करून दिला.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सुयोग्य जोडीदार शोधणे ही पालकांसमोरील मोठी समस्या बनली आहे. ही गरज ओळखून मराठा मंडळातर्फे दरवर्षी या परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते. विवाह जुळविण्याच्या उद्देशाबरोबरच समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

यंदाच्या मेळाव्याचे नेटके व शिस्तबद्ध नियोजन मराठा मंडळाच्या वधू-वर समितीने केले होते. वधू-वर आणि पालकांना एकमेकांशी संवाद साधता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला मराठा मंडळ मुलुंडचे अध्यक्ष श्री. शिवाजी सावंत आणि कार्याध्यक्ष श्री. विनय शेलार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वधू-वर समितीचे प्रमुख श्री. संजय परब, निमंत्रक श्री. प्रसाद कदम, श्री. सदानंद दळवी, श्री. श्रीकांत पालव यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

उत्तम नियोजन, पारदर्शक संवाद आणि आपुलकीच्या वातावरणामुळे मेळाव्यात सहभागी झालेल्या पालक व विवाहेच्छुक उमेदवारांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

समाजातील विवाहेच्छुकांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.