महिलांसाठी पनवेल मनपाचे विशेष आरोग्य शिबिर

महिलांसाठी पनवेल मनपाचे विशेष आरोग्य शिबिर

पनवेल, दि. ७ : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकनेते प्रभाग ड अंतर्गत दि. बा. पाटील विद्यालय, पनवेल येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सभागृह नेते प्रकाश बिनेदार, प्रभाग समिती डचे सभापती अजय बहिरा, महापालिका सदस्य सुमित झुंजारराव, मनिषा म्हात्रे, आर्या जाधव, डॉ. आरती कुलकर्णी, डॉ. रीना कारकिल्ले आणि डॉ. ज्योती उपस्थित होत्या.

महिलांमध्ये विशेषतः चाळीशीनंतर सांधेदुखी, आमवात, गुडघेदुखी यांसह विविध आरोग्यविषयक समस्या आढळतात. महिलांना या समस्यांबाबत योग्य मार्गदर्शन व उपचार मिळावेत, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने महिलांनी त्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रभाग समिती डचे सभापती अजय बहिरा यांनी महापालिका आरोग्य सेवेला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. महापालिकेने स्वतःची प्रयोगशाळा सुरू केली असून, बाहेरील प्रयोगशाळेत तपासणी करणे शक्य नसलेल्या महिलांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिबिरात सांधेदुखी, गुडघेदुखी, हात पायांची सूज व मुंग्या येणे, नसांशी संबंधित त्रास, मान, पाठ व कंबरदुखी यांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, स्तन, गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, सिकसेल आजार आणि रक्तक्षय तपासणी अशा विविध आरोग्य सेवा देण्यात आल्या.

शिबिराचा २०० हून अधिक महिलांनी लाभ घेतला. यामध्ये २६६ महिलांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी पॅप स्मीअर टेस्ट केली. इतर आरोग्य तपासणी व सेवांचाही महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. मनिषा चांडक, डॉ. सुरेश पंडित, डॉ. भक्तराज भोईटे तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिलांसाठी पुढील आरोग्य शिबिरे ८ ऑक्टोबर रोजी प्रभाग अ अंतर्गत काळभैरव सभागृह, कळंबोली येथे, ९ ऑक्टोबर रोजी प्रभाग क अंतर्गत प्रभाग समिती कार्यालय, कामोठे येथे आणि १० ऑक्टोबर रोजी प्रभाग ब अंतर्गत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सेक्टर १५, खारघर येथे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.