मुलुंड मराठा मंडळावर अजिंक्य पॅनलचा एकतर्फी विजय
मुलुंड : मराठा समाजाचे उपनगरातील महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेच्या २०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत अजिंक्य पॅनलने ऐतिहासिक विजय मिळवला. अध्यक्षपदासह कार्यकारिणीच्या सर्व १४ जागांवर विजय मिळवत पॅनलने संस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अध्यक्षपदी शिवाजी जगन्नाथ सावंत यांची निवड झाली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवाजी सावंत यांनी ५५८ मते मिळवून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या निवडणुकीत एकूण ८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्थेच्या विकासकामांवर आणि पारदर्शक कारभारावर विश्वास व्यक्त करत सभासदांनी अजिंक्य पॅनलला भरघोस पाठिंबा दिला.
कार्यकारिणी सदस्यपदाच्या निवडणुकीत अजिंक्य पॅनलच्या सर्व १४ उमेदवारांनी विजय मिळवला. या निवडणुकीत एकूण ७७० मतदान झाले. सौ. शुभदा योगेश म्हामुणकर यांनी ५३४ मते मिळवून सर्वाधिक मते मिळविण्याचा मान पटकावला. श्री. संतोष परशुराम सावंत यांनी ५२८ मते मिळवून दुसरे स्थान मिळवले. श्री. विनय नारायण शेलार आणि सौ. सोनाली संतोष सावंत यांनी प्रत्येकी ५१९ मते मिळवली.
विजयी झालेल्या अन्य कार्यकारिणी सदस्यांमध्ये रमेश लक्ष्मणराव शिंदे, दीपक सगुण राणे, सचिन भालचंद्र पाटील, रवींद्र वासुदेव सावंत, संतोष गंगाराम महाडिक, वैभव अरविंद राणे, अरुण विठ्ठल चव्हाण, दीपक धोंडीराम सावंत, मनोहर जनार्दन जुन्नरे आणि निलेश शंकर सुर्वे यांचा समावेश आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि सभासदांनी श्री तुळजाभवानीची ओटी भरून आनंद व्यक्त केला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी आणि सभासदांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी या विजयाबद्दल सभासदांचे आभार मानले. संस्थेच्या प्रामाणिक कार्यावर आणि समाजहिताच्या ध्येयावर सभासदांनी विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय केवळ एका पॅनलचा नसून मराठा समाजाच्या एकजुटीचा आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास संस्थेच्या सर्वांगीण विकासातून आणि नवीन समाजोपयोगी उपक्रमांतून सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. अजिंक्य पॅनलच्या विजयाबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.