सेवा संकल्प अभियानातून महिलांना आरोग्यसेवा
पनवेल, दि. ८ : पनवेल महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथील काळभैरव सभागृहात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा सुमारे २०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग समिती अ चे सभापती रविंद्र भगत, महापालिका सदस्य सरस्वती काथारा, मोनिका महानवर, योगिता फडके, मनाली ठाकूर आणि बायजा बारगजे यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी ममता प्रितम म्हात्रे यांनी शिबिराविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या शिबिरात महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. सांधेदुखी, गुडघेदुखी, हात-पायांना सूज येणे, मुंग्या येणे, नसांशी संबंधित त्रास तसेच मान, पाठ आणि कंबरदुखी यांसारख्या समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग आणि दंतरोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी, मुख कर्करोग तपासणी, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सिकलसेल आजार आणि रक्तक्षयाची तपासणीही करण्यात आली.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. मनिषा चांडक, डॉ. सुरेश पंडित, डॉ. भक्तराज भोईटे तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढील आरोग्य शिबिरांचे वेळापत्रक
९ ऑक्टोबर रोजी प्रभाग क अंतर्गत प्रभाग समिती कार्यालय, कामोठे येथे, तर १० ऑक्टोबर रोजी प्रभाग ब अंतर्गत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सेक्टर १५, खारघर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.