पालावर जाऊन पंकजा मुंडेंनी जपले मायेचे नाते
पुणे, दि. ११ : राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या पालावर भेट देत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सुख-दुःख आणि समस्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच पालावर चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
दिवाळीनिमित्त गावापासून दूर राहून ऊसतोडीचे काम करणाऱ्या कामगारांसोबत सण साजरा करण्याचा हा उपक्रम त्यांच्यासाठी आनंददायी ठरला. यावेळी कामगार महिलांनी पंकजा मुंडे यांना साडीचोळीची ओवाळणी भेट दिली. तसेच त्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दरवर्षी कष्टकरी कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न असतो. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांच्या विविध समस्या सोडवता याव्यात, यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असून कामगारांनी आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार सुनील शेळके यांनी कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी पंकजा मुंडे नेहमी उभ्या राहत असल्याचे सांगितले. त्यांच्या पालावरील भेटीमुळे कामगारांसोबत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
पालावर उत्साहात स्वागत
पंकजा मुंडे यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांनी पालावर स्वागताची विशेष तयारी केली होती. पालासमोर रांगोळी, पारंपरिक बंजारा लोकगीते, चिमुकल्यांसाठी नवीन कपडे, भोजनाची व्यवस्था आणि परिसराची स्वच्छता अशा विविध माध्यमांतून कामगारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यामुळे संपूर्ण परिसरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.