धरणगाव बाजार समिती शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे केंद्र बनवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
धरणगाव, दि. ३१ : शेतकरी हा बाजार समितीचा खरा मालक असून, बाजार समित्या केवळ शेतमाल खरेदी-विक्रीपुरत्या मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची केंद्रे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि आदर्श बाजार समिती म्हणून धरणगावची ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय शेतमाल खरेदीसाठी उभारण्यात आलेल्या नवीन गोदामाचे तसेच व्यापारी आणि बाजार समितीतील विविध घटकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या दोन जी.आय. शेडचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव आणि एरंडोल शहरांसाठी प्रत्येकी एक अशा दोन पाण्याच्या टँकरचेही लोकार्पण करण्यात आले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बाजार समितीने हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची कार्यवाही सुरू झाली असून, शेतकऱ्यांच्या संकटात शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
उपबाजारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
धरणगाव बाजार समितीने शेतकरीहिताचे विविध उपक्रम राबविले असून, नव्याने उभारलेल्या गोदामाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे. पांढरी विहीर झुरखेडा येथे जागा उपलब्ध असल्यास उपबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोदाम बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. हेडगेवार नगरसाठी सुमारे २१ कोटी रुपयांची सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. अंजनी येथून सुमारे ११ किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याचे नियोजन असून, या योजनेची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बाजार समितीच्या सर्व संचालकांनी परस्पर सहकार्याने आणि खेळीमेळीच्या वातावरणात काम करावे. राजकारणात दिलेल्या शब्दाला महत्त्व असते. त्यामुळे सभापतिपदाच्या कालावधीबाबत दिलेला शब्द पाळला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील यांनी बाजार समितीच्या विकासात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. बाजार समितीला वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. आगामी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती गजानन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन माजी सभापती जिजाबराव पाटील यांनी केले, तर आभार सभापती प्रेमराज पी. पाटील यांनी मानले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सुभाषअण्णा पाटील, पी. सी. पाटील, डी. जी. पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती सुदाम पाटील, जिजाबराव पाटील, रघुनाथ पाटील, रंगराव पाटील, रमेश पाटील, सुरेखा चौधरी, लताबाई पाटील, संजय काबरा, सुनील पवार, किरण पाटील, संजय जुलाल पवार, रेखाबाई पाटील, दिलीपराव धनगर, रवींद्र पाटील, नितीन कर्वा, ज्ञानेश्वर माळी, सचिव राजेंद्र पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, हमाल, मापाडी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.