पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार

पुणे, दि. ३ : आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रोचे आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन ही महत्त्वाची पावले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या उद्घाटनासह मेट्रो टप्पा २ मधील विस्तारित मार्गिकांचे भूमिपूजन समारंभ पार पडला.

सन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेची पायाभरणी करण्यात आली होती. आता हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित होत आहे. टप्पा २ मधील चारही मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यांचे भूमिपूजन होत असल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या निर्मितीपासून ते मंजुरीपर्यंत दिवंगत अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अर्थमंत्री म्हणून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय मेट्रो रेल धोरणांतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्यात आलेली मार्गिका ३ ही देशातील पहिली मेट्रो मार्गिका आहे. टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. थर्ड रेल तंत्रज्ञानावर आधारित ही महाराष्ट्रातील पहिली मेट्रो मार्गिका आहे. या मार्गावर आर. के. लक्ष्मण संग्रहालय स्थानक असून, सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी ही मेट्रो महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, मार्गिका ३ ही देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो मार्गिका ठरणार आहे. सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थानकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली आहे.

मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांमुळे वनाज ते चांदणी चौक तसेच रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जाणार आहेत. एकूण ३१ किलोमीटर लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारणार आहे.

हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या कामांचाही अजित पवार यांनी सातत्याने आढावा घेतला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पावसाळ्यात हिंजवडी परिसरात पाणी साचू नये, याबाबतही त्यांनी विशेष लक्ष दिले होते, अशी आठवण सुनेत्रा पवार यांनी सांगितली.

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी या विषयांवर नियमित समन्वय बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामे प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री म्हणून स्वतः लक्ष देणार असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.