ग्रामविकास विभागाच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे

ग्रामविकास विभागाच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे

मुंबई : गावांच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायती आणि सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असताना ग्रामविकास विभागाकडून अपेक्षित सहकार्य आणि प्रभावी संवाद मिळत नसल्याची भावना सरपंचांमध्ये निर्माण झाली आहे. गावांचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत यंत्रणेला अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी म्हटले आहे.

गावपातळीवरील विविध प्रश्नांबाबत ग्रामविकास विभागाने सरपंचांशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच मूलभूत सुविधांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक अधिकार, निधी आणि प्रशासकीय सहकार्य वेळेत मिळणे गरजेचे आहे. मात्र अनेक ठिकाणी या बाबतीत अडचणी निर्माण होत असल्याचे सरपंच परिषदेकडून सांगण्यात आले.

गावगाड्याच्या कामकाजासंदर्भात अपेक्षित संवाद होत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालून ग्रामविकास विभागाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी दत्ता काकडे यांनी केली.

सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतींचा आवाज शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संवादाची यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. गावांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक अधिकार आणि निधी उपलब्ध करून देतानाच प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षाही सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतींच्या प्रश्नांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून गावांच्या विकासासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील, असे दत्ता काकडे यांनी स्पष्ट केले.