अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक' उपक्रमाचा शुभारंभ

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक' उपक्रमाचा शुभारंभ

पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ : पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी येथे करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते योगेश बहल यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करताना, "आपले शहर प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक' हा उपक्रम शहर स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे," असे सांगितले.

कार्यक्रमाला पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, ज्येष्ठ नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, जितेंद्र ननावरे, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, सारिका मासुळकर, राजू बनसोडे, विराज लांडे, पंकज भालेकर, उज्वला ढोरे, निकिता कदम, माजी नगरसेवक पंडित गवळी, सीमा सावळे, फजल शेख, आशा शेडगे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, शेखर काटे, सारंग कामतेकर, दीपक साकोरे, चंद्रराम हलगी, जव्हार इटकल, संपदा पांचुदकर, शुक्रुल्ला पठाण, रमजान सय्यद, मनीषा गटकळ, डॅनियल दळवी, कविता खराडे, प्रवीण पिंजन, बाबा चौधरी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पृथ्वी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रशीद सय्यद यांनी सांगितले की, प्लास्टिक प्रदूषण ही गंभीर पर्यावरणीय समस्या असून प्रत्येक नागरिकाने वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक'मध्ये जमा कराव्यात. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल.

फाउंडेशनचे सचिव व कार्यक्रम समन्वयक रवींद्र ओव्हाळ यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या आधुनिक विकासाचा पाया दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रचला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहरात रस्त्यांचे रुंदीकरण, स्मार्ट सिटी, मेट्रोसारखे महत्त्वाचे विकास प्रकल्प साकार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेला देशातील स्वच्छ शहराचा मान मिळाला होता. त्यांच्या स्मृतींना अभिवादन आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, आगामी काळात शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक 'प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक' उभारून जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत रवींद्र ओव्हाळ, सूत्रसंचालन अविनाश शिंदे यांनी केले, तर विनोद वरखडे यांनी आभार मानले.