संविधान महोत्सवात चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संविधान महोत्सवात चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधान महोत्सवात चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधान महोत्सवात चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे, दि. २५ : भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित संविधान महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी टिळक उद्यान, गावदेवी मैदान येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महापालिका आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि रंगांच्या माध्यमातून संविधान, लोकशाही, सामाजिक एकता, समता आणि देशप्रेम यांसारख्या विषयांवर आकर्षक चित्रे साकारली. या कलाकृतींतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि संविधानिक मूल्यांविषयीची जाणीव दिसून आली.

दरम्यान, संविधान महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी गावदेवी मैदान येथे लोकशाहीर नंदेश विठ्ठल उमप यांच्या कोहिनूर भारताचा या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा, संघर्षाचा आणि योगदानाचा संगीतमय आढावा सादर करण्यात आला.

गीत, संगीत आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार आणि प्रेरणादायी कार्य रसिकांसमोर मांडण्यात आले. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले.

यावेळी प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका तसेच ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

संविधानाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या महोत्सवातून कला, संस्कृती आणि जनजागृतीचा प्रभावी संगम अनुभवायला मिळत आहे.