प्रशिक्षणातून रोजगारनिर्मितीवर भर द्यावा
हिंगोली, दि. २ : युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षणातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रशिक्षणाला उत्पादनाभिमुखतेची जोड द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन विविध व्यवसायांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधून प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली.
प्रशिक्षणार्थ्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी उपयोग व्हावा, यासाठी प्रशिक्षणाची दिशा निश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच मागील वर्षी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या स्थितीचा आढावा घेतला.
अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसशिप, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळण्यासाठी संस्थेने उद्योगक्षेत्राशी समन्वय वाढवावा, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले. प्रत्यक्ष कामाचा अनुभव, उत्पादनाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांची सांगड घालून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.