भिवंडीत महाराष्ट्र डाईंगवर महानगरपालिकेची आकस्मिक कारवाई

भिवंडीत महाराष्ट्र डाईंगवर महानगरपालिकेची आकस्मिक कारवाई
भिवंडीत महाराष्ट्र डाईंगवर महानगरपालिकेची आकस्मिक कारवाई
भिवंडीत महाराष्ट्र डाईंगवर महानगरपालिकेची आकस्मिक कारवाई

भिवंडी, दि. 11 ऑगस्ट 2026 (प्रतिनिधी) – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र डाईंग उद्योगाची आणि तेथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (ETP) आकस्मिक संयुक्त पाहणी केली असता, प्रक्रिया केलेले सांडपाणी अनधिकृतपणे थेट महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी उपायुक्त (पर्यावरण) बाळकृष्ण क्षिरसागर यांच्यासह ही पाहणी केली. तपासणीदरम्यान ETP प्रकल्प सुरू असल्याचे आढळले; मात्र त्या प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी थेट महानगरपालिकेच्या मलनिस्सारण यंत्रणेत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले.

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सरफराज अन्सारी यांनी कायदेशीर पंचनामा करून सांडपाण्याचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

पाहणीदरम्यान मालमत्ता कर, परवाना प्रमाणपत्र, पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला, अग्निशामक विभागाचा ना-हरकत दाखला तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) Consent to Operate प्रमाणपत्र यांचीही तपासणी करण्यात आली.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्रक्रिया न केलेले अथवा नियमबाह्य पद्धतीने सोडण्यात आलेले सांडपाणी महानगरपालिकेच्या नाल्यात सोडल्याबाबत मलनिस्सारण व स्वच्छता विभागामार्फत कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

या कारवाईत पर्यावरण विभाग प्रमुख सुनिल भोईर, उपअभियंते सरफराज अन्सारी व नफीस अन्सारी यांच्यासह पर्यावरण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.