पनवेल,दि.१५: पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) श्री. महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त (शिक्षण) श्री. नानासाहेब कामठे, सहाय्यक आयुक्त (शिक्षण) श्रीमती रुपाली माने आणि शिक्षणाधिकारी श्री. रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेमार्फत दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, शाळा क्र. 1 येथे शिक्षण परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पूजन सोहळा अतिरिक्त आयुक्त श्री. महेशकुमार मेघमाळे, शिक्षणाधिकारी श्री. रमेश चव्हाण आणि महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती सुहिता आव्हाळ यांच्या हस्ते पार पडला.
परिषदेच्या प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी श्री. रमेश चव्हाण यांनी पनवेल मनपा शाळांमधील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे कौतुक केले.
या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. यामध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील शिक्षणविषयक नियोजन, 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी नर्सरी शिक्षणाची अंमलबजावणी, नव्याने समाविष्ट झालेल्या 51 शाळांमुळे निर्माण झालेली आव्हाने, शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांचे नियोजन, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, वाचन-लेखन कौशल्य वाढविण्याच्या पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीची तयारी, इयत्ता 1 ते 5 मुलभूत कौशल्य वृद्धीसाठी शासनाच्या साधनांचा वापर, पालकांचे योगदान तसेच विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी सेमी इंग्रजीचा पर्याय यांचा समावेश होता.
यानंतर अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) श्री. महेशकुमार मेघमाळे यांनी उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांचे विशेष कौतुक करून पालिकेचे शिक्षणविषयक व्हिजन स्पष्ट केले. शिक्षण विभागाचे कार्य समाधानकारक असल्याचे नमूद करत त्यांनी शाळांची पटसंख्या आणि गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्र समन्वयक श्री. अशफाक काझी, केंद्र प्रमुख श्री. वाल्मिक राठोड, केंद्र प्रमुख श्री. वैभव पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती वैशाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री. वाल्मिक राठोड यांनी केले.