पनवेलमध्ये अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक कारवाई
पनवेलमध्ये अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक कारवाई

पनवेल, दि. १९ : पनवेल शहरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार प्रभाग समिती क, ब आणि ड अंतर्गत विविध ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान अनधिकृत हातगाड्या आणि विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

प्रभाग समिती क अंतर्गत सेक्टर २१ मधील व्हिस्टा कॉर्नर परिसरात फळविक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यासह अनधिकृत हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या हातगाड्या तोडण्यात आल्या.

कामोठे येथील सेक्टर ११ मधील ॲक्सिस बँकेसमोरील पदपथावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे संबंधित पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

प्रभाग समिती ब अंतर्गत खारघरमधील सेक्टर १३ येथील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फळविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पादचारी मार्गावरील अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळे करण्यात आले.

दरम्यान, प्रभाग समिती ड अंतर्गत नवीन पनवेल परिसरातही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर अनधिकृतपणे विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

अतिक्रमणविरोधी कारवाई यापुढेही सुरू राहणार

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना पदपथांवरून ये जा करताना अडचणी येऊ नयेत आणि शहराचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर, टपऱ्या आणि शेड उभारणाऱ्यांविरोधातही यापुढे कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.