नऊ विशेष पथकांमार्फत गावागावांत लाभांचे वितरण

नऊ विशेष पथकांमार्फत गावागावांत लाभांचे वितरण
नऊ विशेष पथकांमार्फत गावागावांत लाभांचे वितरण

ठाणे, दि. १७ ऑक्टोबर : शासकीय योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत शहापूर तालुक्यात घरपोच लाभ वाटप योजनेचा शुभारंभ आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानासाठी महसूल प्रशासनाने मंडळनिहाय नऊ विशेष पथके स्थापन केली असून, ही पथके तालुक्यातील गावांमध्ये तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणार आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय दाखले, सातबारा उतारे आणि अन्य महसूलविषयक सेवांसाठी सरकारी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन सेवा सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गावांमध्ये जाऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि शासकीय योजनांचे लाभ वितरित करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होत असून, प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय अधिक दृढ होत आहे.

अभियानादरम्यान भूमी अभिलेख आणि महसूलविषयक कामांसाठी आवश्यक असलेले ७ ई आणि १२ ई उतारे लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहेत. तसेच जमिनींच्या नोंदींमधील अटी व शर्तींनुसार बदल करून शर्ती कमी केलेले ४३ अद्ययावत सातबारा उतारे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात येत आहेत. याशिवाय, परिसरातील १५ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले आणि अधिवास प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत आहे.

प्रलंबित वारस नोंदी पूर्ण करून सुधारित सातबारा उतारे देण्याची कार्यवाहीही अभियानांतर्गत करण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतातील पानंद रस्त्यांचे महत्त्व, त्यांची उपलब्धता आणि संबंधित कायदेशीर तरतुदींबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

अभियानाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली नऊ विशेष पथके येत्या सोमवारपर्यंत शहापूर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीपर्यंत पोहोचणार आहेत. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने आणि तहसीलदार सचिन चौधर यांच्या नियोजन व सहकार्यामुळे अभियानाला गती मिळाली आहे. शहापूर तालुक्यात प्रांताधिकारी अमित सानप आणि तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या पुढाकारातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत गोठेघर मंडळातील मौजे गोठेघर येथील एका वनपट्टाधारकासाठी स्वतंत्र सातबारा उतारा तयार करण्यात आला. महसूल प्रशासनाने संबंधित लाभार्थ्याच्या घरी जाऊन हा उतारा सुपूर्द केला. त्यामुळे घरपोच शासकीय सेवा देण्याच्या अभियानाच्या उद्देशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे.

शासकीय योजनांचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वेळेत आणि सहजतेने पोहोचविणे, हा सेवा संकल्प अभियानाचा मुख्य उद्देश आहे. घरपोच सेवा वितरणाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळत असून, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.